” माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा “

माळेगाव (बारामती झटका)

शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अभियंत्यांचे प्रेरणास्थान असणारे भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम. मुकणे यांनी दिली.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणारे संस्थेचे सचिव मा. श्री प्रमोद शिंदे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन व प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सर विश्वेश्वरय्या यांचे संपूर्ण जीवनचरित्र हे अभियंत्यांना सकारात्मक ऊर्जा देणारे असून सर्व अभियंत्यांनी मानव कल्याणासाठी अभियांत्रिकी ज्ञानाचा वापर केला पाहिजे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील शरद सभाग्रह येथे सोशल डिस्टंसिंग चे पालन करून करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.15 सप्टेंबर रोजी इंजिनियर्स-डे संपूर्ण देशात साजरा केला जातो. हा दिवस देशाचे महान अभियंता भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना समर्पित आहे.ते केवळ भारताचे महान अभियंताच नव्हते तर अर्थशास्त्रज्ञ, स्टेट्समन तसेच देशाचे निर्माता होते.
औद्योगिक स्त्रोतांमधून नाले बांधणे, धरणे व कालवे बांधणे, पाणीपुरवठा करण्यासाठी बांधकामे आणि नैसर्गिक स्त्रोतांमधून गलिच्छ पाणी काढून टाकणे या व्यतिरिक्त त्यांनी औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. त्यांनी केवळ अभियांत्रिकी क्षेत्रातच विलक्षण कामगिरी केली नाही तर काही प्रसंगी देशप्रेमाचे एक उदाहरण ठेवले जे अनुकरणीय आहे.
कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे येथून सर विश्वेश्वरय्या यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले.1955 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कृष्णराज सागर धरण, भद्रावती लोहा व स्टील वर्क्स, म्हैसूर चंदन तेल व साबण कारखाना, म्हैसूर विद्यापीठ, बँक ऑफ म्हैसूर आणि इतर अनेक संस्था यांचे काम त्यांनी केले. धरणातून पाण्याचा प्रवाह थांबविण्यासाठी त्यांनी स्वयंचलित स्टीलचे दरवाजे बांधले आणि सिंचनासाठी एक ब्लॉक सिस्टम विकसित केला जो आतापर्यंत अभियांत्रिकीचा एक अद्भुत पराक्रम मानला जातो. दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्यांना सोडवण्यासाठी अभियंत्यांनी अभियांत्रिकीमधील नाविन्यपूर्ण व समाजोपयोगी संशोधनावर भर द्यावा असे मनोगत प्राचार्य डॉ.एस.एम. मुकणे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महाविद्यालयातील प्राध्यापिका वनिता सावंत यांनी केले. या कार्यक्रमासाठी शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब तावरे , विश्वस्त श्री.वसंतराव तावरे , श्री.अनिल जगताप , श्री.महेंद्र तावरे , श्री.रामदास आटोळे , श्री.गणपत देवकाते , श्री.रवींद्र थोरात , सौ. सीमा जाधव , सौ. चैत्राली गावडे व संस्थेचे सचिव श्री.प्रमोद शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here