आळंदी-पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर माळशिरस तालुक्यातील उड्डाणपुलाबाबत संभ्रमावस्था.

उड्डाणपूल रद्द व्हावा यासाठी ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी यांच्याकडे केली मागणी.

सदाशिवनगर ( बारामती झटका )

आळंदी-पुणे-पंढरपूर पालखी महामार्गाचे काम सुरू आहे. माळशिरस तालुक्यात पालखी महामार्गावर काही ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू झालेले आहे. स्थानिक नागरिकांनी उड्डाणपुलास विरोध केलेला असून स्थानिक ग्रामपंचायतीने ठराव करून सदरचे उड्डाणपूल रद्द करावेत असा पत्रव्यवहार लोकप्रतिनिधी यांच्याकडे करून रद्द करण्याची मागणी केलेली आहे. त्यामुळे उड्डाण पुलाबाबत संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे.
माळशिरस तालुक्यात पालखी महामार्गाची धर्मपुरीपासून सुरुवात होत आहे. नातेपुते गावाला बायपास मंजूर झालेला आहे. सदरचा बायपास मांडवे गावाच्या हद्दीपर्यंत येत आहे. मांडवे गावच्या हद्दीपासून पुरंदावडे सदाशिनगर या गावापर्यंत जवळजवळ चार उड्डाणपूलाचे काम सुरू झालेले आहे. उड्डाणपूल झाल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला उदरनिर्वाह करणारे छोटे छोटे उद्योग व्यवसायावर परिणाम होणार आहे. काही लोकांनी भविष्यामध्ये उद्योग-व्यवसाय करण्याकरता पालखी महामार्ग होणार असल्याने आजूबाजूला जमिनी खरेदी करून ठेवलेल्या आहेत. उड्डाणपूल झाल्यानंतर सदरच्या ठिकाणी उद्योग व्यवसाय सुरु करण्यास अडचणी येणार आहेत, अशी बाब लक्षात आल्यानंतर अनेक ग्रामपंचायत यांनी ठराव करून सदरचे उड्डाणपूल रद्द करावे, याची मागणी लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत केलेली आहे. लोकप्रतिनिधींनी सुद्धा केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्रव्यवहार करून स्थानिक व्यापारी व शेतकरी यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत.


आळंदी-पुणे-पंढरपूर हा पालखी मार्ग मोठा होण्याचे कारण, या महामार्गावरून दरवर्षी असंख्य वारकरी आषाढी वारीच्या वेळेला जात असतात. आषाढी वारीच्या वेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याबरोबर अनेक वैष्णव असतात. त्यामुळे श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाला अनन्य साधारण महत्त्व आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखीचे माळशिरस तालुक्यात आगमन झाल्यानंतर पहिले गोल रिंगण सदाशिवनगर, पुरंदावडे येथे होत असते. पहिले गोल रिंगण पाहण्याकरता अनेक वैष्णव भाविक भक्त येत असतात आणि त्याच गोल रिंगण परिसराच्या बाजूने पालखी महामार्गाचा उड्डाणपूल तयार करण्याचे काम सुरू आहे. काही वैष्णवांच्या मते पालखीच्या वेळेला मोठी गर्दी असते. अपरिहार्य कारणाने अनुचित प्रकार घडला अशा वेळेला गर्दीतील लोकांना बचाव करण्याकरता उड्डाणपुलाची अडचण येणार आहे. जर पालखी महामार्ग मोठा करीत असताना वैष्णव व भाविक भक्त यांच्यासाठी करायचा असेल तर त्यांना भविष्यात अडचण होणार नाही, याचाही विचार प्रशासनाने करायला हवा, असे वैष्णव यांच्या मधून बोलले जात आहे. उड्डाणपूल करण्याऐवजी आजूबाजूच्या गावातील लोकांना ज्या ठिकाणी पालखी महामार्गाला रस्ता मिळतो त्या ठिकाणी भुयारी मार्ग काढलात तरीसुद्धा पर्यायी मार्ग होऊ शकतो. भुयारी मार्गाने आजूबाजूच्या गावातील लोकांना पालखी महामार्गावर येण्याची अडचण होणार नाही आणि महामार्गाच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व व्यापारी, स्थानिक नागरिक यांची अडचण होणार नाही, यासाठी प्रशासनाने उड्डाणपूल रद्द करून भुयारी मार्गाचा अवलंब करावा, असे वैष्णव भाविक भक्त व सर्वसामान्य जनता यांच्यामधून बोलले जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here