उन्हाचा वाढता कडाका, महावितरणचा वीज तोडणीचा तडाका, शेतकऱ्यांच्या पिकाला बसला फटका..

हाता-तोंडाला आलेली पिके विजेअभावी जळू लागली

श्रीपूर (बारामती झटका)

श्रीपुर (ता. माळशिरस) सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके सुकू लागली आहेत. पाणी मुबलक आहे पण, विजेअभावी पिके जळू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी हतबलपणे विज कधी जोडतील याकडे डोळे लावून बसला आहे. सध्या उन्हाचा वाढता कडाका महावितरणाचा वीज तोडणीचा लावलेला तडाका, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा फटका बसला आहे, यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. हे माञ तितकेच खरे आहे.

सध्या, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात उन्हाची दाहकता वाढत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पिकांना जास्त व वेळेवर पाणी मिळणे, गरजेचे असते. त्यामुळे शेतकरी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून विंचू-काट्याची तमा न बाळगता तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या पिकांना पाणी देत असतो. उन्हाळ्याच्या दिवसात एक तर मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई जाणवत असते आणि त्यामधे विजेचे सारखे जाणे-याणे हे सुरूच असते. त्यामुळे उन्हाळ्यात पिके जपणे हे शेतकऱ्यांना जिकिरीचे काम असते. उन्हाळ्यात जर का पिकांना पाणी योग्य वेळी नाही मिळाले तर, पिके तर जळतातच पण ती पिके पुन्हा लवकर तळावर येत नाहीत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होत असते. यापूर्वी पाणी नसल्यामुळे पिके जळायची आणि सध्याची परिस्थिती अशी झाली आहे पाणी मुबलक प्रमाणात आहे पण महावितरणने बिल न भरल्यामुळे वीज कनेक्शन, डिपी सोडविले आहेत. वीजेअभावी शेतातील उभे पिके जळू लागली आहेत. त्यामुळे सरकारने अशावेळी शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. शेतकऱ्यांना वीजबिल भरणा करण्यासाठी मुदत दिली पाहिजे, अशी चर्चा सध्या गावोगावातील शेतकऱ्यांमधून ऐकायला मिळत आहे.

महावितरणने थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी सर्वत्र वीज तोडणी व कपातीचा सपाटा चालू केला आहे. या प्रकारामुळे शेतकरी राजा हतबल झाला असून विजेअभावी शेतातील पिके जळू लागली आहेत. अशी विचित्र परिस्थिती सध्या ग्रामीण भागात झाली आहे.
गेल्या वर्षी कोरोनाचे सावट त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला नाही. शेतात तसाच माल गाडला गेला, त्यानंतर उद्भवलेली पुरस्थिती, त्यानंतर अतिवृष्टी यामुळे शेतकरी संकटात सापडला होता. त्यातूनही शेतकरी सावरतोय तोपर्यंत महावितरण कंपनीद्वारे वीज बिलाची सक्तीची वसुली केली जात आहेत. विज कनेक्शन बंद करण्यात आली आहेत.

भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारतामध्ये शेतीला अनन्य साधारण महत्व आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून त्याकडे पाहिले जाते. त्याच शेतकऱ्यांना सरकारकडून वेठीस धरले जात आहे. ही मोठी शोकांतिका आहे. अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांना वीज कनेक्शन जोडून दिलासा देणे गरजेचे आहे, अन्यथा हाता-तोंडाला आलेली पिके वीज सोडवल्यामुळे जळून जातील. तरी सरकारने शेतकऱ्यांना मुदत देऊन त्यांची वीज पुरवठा सुरळीत चालू करावी अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.

सध्या उन्हाळा असल्याने पिके जपणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान समोर उभ आहे. त्यामुळे रात्रंदिवस जागरण करून पिकांना पाणी द्यावे लागत आहे. उन्हाळ्यात जर पिकांना योग्य वेळी पाणी नाही मिळाले तर उत्पन्न घटते. त्यामुळे आजपर्यंत पाणी नसल्याने पिके जळू लागली, असे आपण म्हणत होतो. पण सध्या पाणी मुबलक असूनसुद्धा विजेअभावी पिके जळू लागली आहेत. त्यामुळे मन सुन्न झाले आहे. – अनिल सावता कचरे शेतकरी, जांबुड

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here