केंद्र सरकारच्या विरोधात पुकारलेल्या भारत बंदला इंदापूर काँग्रेसचा पाठिंबा.

तहसिलसमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण.

इंदापूर (बारामती झटका) शिवाजी पवार यांजकडून

केंद्र सरकारने पारित केलेले नवे कृषी कायदे व महागाईविरोधात शेतकरी संघटनांच्या भारत बंदला काँग्रेसने सक्रीय पाठिंबा दर्शवला असून महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे सरचिटणीस तानाजी भोंग यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.

यावेळी बोलताना सरचिटणीस तानाजी भोंग म्हणाले, सदरील कृषी कायद्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा झाली पाहिजे. शेतकरी संघटनासह प्रमुख विरोधी पक्ष यांच्याशी चर्चा केली गेली पाहिजे. हे कायदे मंजूर झाल्यापासून देशभर पाचशेच्यावर शेतकरी संघटना आंदोलन करीत आहेत. काँग्रेस पक्षाने कायद्याविरोधात वेळोवेळी मोर्चे, निदर्शने, स्वाक्षरी मोहिम राबवली आहे. दिल्लीला लोकशाही पद्धतीने आपल्या मागण्या केंद्र सरकार पुढे मांडण्यासाठी निघालेल्या लाखो शेतकऱ्यांना विविध महामार्गावर अन्यायकारक पद्धतीने त्यांची अडवणूक करुन केंद्र सरकार अतिशय क्रूर पद्धतीने आपल्या देशातील अन्नदात्याशी वागत असल्याचे भोंग यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, केंद्र सरकार दिवसाढवळ्या लोकांच्या खिशावर दरोडा टाकत आहे. पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर तर गॅस सिलेंडर ८५० रुपये झाला आहे. इंधनावरील केंद्र सरकारने कर कमी करुन लोकांना दिलासा द्यावा महागाई व इंधन दरवाढ कमी करावी असे भोंग यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना नको असलेले हे तीनही कृषी कायदे मागे घ्यावेत, जोपर्यंत ते कायदे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत काँग्रेस पक्ष लोकशाही मार्ग स्वीकारुन लढत राहण्यासाठी तयार आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये असे तानाजी भोंग म्हणाले.

या उपोषणात महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे सरचिटणीस तानाजी भोंगसह तालुका सरचिटणीस राहुल आचरे, नितीन राऊत, संतोष शेंडे, विलास गायकवाड, सचिव अरुण राऊत, शहर युवक काँग्रेसचे सुफियान खान जमादार, रविंद्र फाळके, देविदास सावंत, सामाजिक कार्यकर्ते अमोल जगताप, बिभिषण लोखंडे आदीं सहभागी झाले होते.

उपोषणास राजकीय पक्ष, सामाजिक संघटनेचा पाठिंबा.

इंदापूरमध्ये काँग्रेसने केलेल्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणास महाविकास आघाडीतील महत्वाचा पक्ष असलेल्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन शिंदे, माजी तालुकाप्रमुख योगेश कणसे, माथाडी कामगार संघटनेचे दुर्वास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हणुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, बिभीषण लोखंडे, पिपल्स रिपब्लिकन पार्टी ( कवाडे गट) चे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय सोनवणे, माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, प्रा.अशोक मखरे, राष्ट्रसेवा दलाचे पुणे जिल्हा संघटक गफुरभाई सय्यद तसेच इंदापूर पंचायत समितीचे माजी सदस्य प्रकाश शिंदे आदींनी उपोषणस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here