‘मातोश्री जिजाऊ या छत्रपती शिवरायांसाठी चालते बोलते विद्यापीठ होत्या’. – स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे

स्वेरीत ‘शिवराज्याभिषेक दिन’ साजरा

पंढरपूर (बारामती झटका)

‘आजच्याच दिवशी, दि. ६ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. त्यांच्या मातोश्री जिजाऊसाहेब या त्यांचे चालते बोलते विद्यापीठच होत्या. बालवयात असलेली विचारांची प्रगल्भता व जाण या गोष्टींची त्यांना मातोश्रींकडून शिकवण मिळाली होती. म्हणुन ‘महाराजांनी जिजाऊ नावाच्या चालत्या- बोलत्या विद्यापीठातून पीएच.डी. घेतली’ असं म्हटलं तर मुळीच वावगे ठरणार नाही. महाराजांनी कोवळ्या वयात सर्व जाती-जमातींना एकत्रित घेऊन स्वराज्याची शपथ घेतली. त्या काळात बलाढ्य अशा आदिलशाही, मोगलशाही कुतुबशाही या सर्व प्रस्थापित सत्तांना ललकारत हिंदवी स्वराज्य स्थापन करून त्यादृष्टीने वाटचाल केली. सामान्य माणूस ज्या गोष्टींची कल्पनाही करू शकत नाही अशा गोष्टी त्यांनी सत्यात उतरविल्या. या सर्व प्रवासात शहाजी महाराजांचा त्याग व महाराजांचे थोरले बंधू संभाजी राजांचे बलिदान देखील विसरणे अशक्य आहे. नव्हे तर तितकेच महत्त्वाचे आहे. स्वराज्यावर आलेल्या विविध आपत्तींना न डगमगता स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराजांनी स्वतःला ‘मिशन मोड’ मध्ये ठेवले. स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खान, शाहिस्तेखान, दिलेरखान, मिर्झाराजे जयसिंग यासारख्या मातब्बर शत्रूंना आणि त्याच बरोबर विविध संकटांना महाराजांनी धैर्य व चिकाटीने तोंड दिले. पुरंदरच्या तहानुसार महाराजांनी आग्र्याला भेट दिल्यानंतर औरंगजेबाने त्यांना धूर्तपणे अटक केली. पण महाराजांनी मोठ्या चलाखीने आणि बुद्धी चातुर्याने स्वतःची व स्वतःच्या मुलाची आणि सोबतच्या मावळ्यांची सुटका करून घेतली. हे सर्व करत असताना स्वतःच्या मुलाच्या सुरक्षतेसाठी त्यांच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली. महाराजांनी रायरेश्वरला स्वराज्याची शपथ घेतानाच ठरवले होते की ‘स्वराज्यासाठी काय पण’ या ‘काय पण’ मध्ये धैर्य, त्याग, बलिदान या सर्व गोष्टींचा समावेश होता. असं असलं तरी सहा जून १६७४ पर्यंत महाराजांना ‘छत्रपती’ ही अधिकृत पदवी नव्हती. त्यांना कोणत्याही मोगल, आदिलशाही किंवा कुतुबशाही यांच्याकडून ही पदवी घ्यायची नव्हती. ते त्यांच्या जनतेच्या मनामध्ये तर विराजमान होतेच पण सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक दिनांक ६ जून १६७४ या दिवशी करून घेतला.’ असे प्रतिपादन स्वेरी चे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे प्राचार्य
डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च इंस्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ‘शिवराज्याभिषेक दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवरायांविषयी सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे हे मनोगत व्यक्त करत होते.
प्रारंभी भव्य अशा शिवमुर्ती ची प्राचार्य रोंगे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी डॉ. रोंगे पुढे म्हणाले की ‘सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा अभ्यास करून त्यांच्यातील गुणांचा आपल्या कुवतीप्रमाणे संग्रह करावा व त्यातील काही गुण आपल्या आचरणात आणावेत.असं जर झालं तर आपलं जीवन सफल झालं असं समजावे. या दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या प्रत्येक विभागात ऑनलाईन मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाले.यावेळी रणवीर माणिक मोरे या चिमुकल्याने बाल शिवाजीचा सुंदर रित्या वेशभूषा करून कार्यक्रमात सहभागी झाला होता तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात प्रा. यशपाल खेडकर यांनीही छत्रपती शिवराय यांच्या जीवनावर विचार मांडले. अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध घटना दर्शविणाऱ्या पोस्टर्स चे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते. या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये अभियांत्रिकी (पदवी व पदविका) एमबीए तसेच कॉलेज ऑफ फार्मसी (पदवी व पदविका) मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. याप्रसंगी स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम.पवार व प्रशासन अधिष्ठाता प्रा. सचिन गवळी, विद्यार्थी अधिष्ठाता प्रा.करण पाटील, डॉ. एम.एम.आवताडे, इलेक्ट्रिकल सुपरवायझर एस. जी. जाधव, समाधान मोरे, सुहास तगारे, इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. संदीपराज साळुंखे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here