स्वेरीचे विद्यार्थी श्रीनाथ देशमुख सुवर्ण पदकाने सन्मानित

पंढरपूर (बारामती झटका)

स्वेरी अभियांत्रिकीत शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये अंतिम वर्षात शिकत असलेल्या श्रीनाथ जयवंत देशमुख यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून ‘कै. श्रीमान भाऊसाहेब गांधी सुवर्णपदक ’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या एप्रिल-मे २०२० या परीक्षेमध्ये सोलापूर विद्यापीठ संलग्नित सर्व महाविद्यालयातून स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विषयांमध्ये सर्वाधिक सीजीपीए गुण घेऊन सर्व प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केल्यामुळे श्री. भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रणजित गांधी पुरस्कृत असलेला ‘कै. श्री. भाऊसाहेब गांधी सुवर्णपदक’ हा पुरस्कार श्रीनाथ जयवंत देशमुख यांनी पटकावला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आयोजित १६ व्या दीक्षांत सोहळा समारंभात महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत आमदार सुभाष देशमुख व कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र देऊन श्रीनाथ देशमुख यांना सन्मानित करण्यात आले. गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील ओसाड माळरानावर संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे आणि त्यांच्या सहकारी अभियंत्यांनी एकत्र येऊन विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी म्हणून सन १९९८ साली उच्च तंत्रशिक्षणाची सोय निर्माण करून दिली. आता मात्र ग्रामीण विद्यार्थ्यांबरोबरच शहरी व देशातील विविध भागातील विद्यार्थ्यांचा कल स्वेरीकडे वाढतोय. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठाच्या शैक्षणिक निकालात स्वेरीचा विशेष दबदबा नेहमीच राहिलेला आहे. महाविद्यालयाच्या स्थापनेनंतर पहिल्याच बॅचची विद्यार्थिनी कु.रुपाली पवार हीने शिवाजी विद्यापीठात प्रथम येऊन सुवर्ण पदक मिळवले होते. श्रीनाथ जयवंत देशमुख यांना स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर व वर्ग शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सुवर्णपदक मिळाल्यामुळे स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज, स्वेरी अंतर्गत असलेल्या बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, अधिष्ठाता, विभागप्रमुख, अभियांत्रिकी व फार्मसीचे सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी श्रीनाथ देशमुख यांचे अभिनंदन केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here