आशा वर्कर्सना शासकीय सेवेत कायमस्वरूपी घेण्यात यावे

माळशिरस (बारामती झटका)

समाजातील तळागाळापर्यंत पोहचून शासनस्तरावरून सर्व माहिती देऊन शासनाचे धोरणात्मक निर्णय समाजातील प्रत्येक घटकाला समजावून सांगण्याची महत्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या आशा वर्कर्स यांना शासकीय सेवेत कायम स्वरुपी सामावुन घ्यावे, अशी मागणी समाजातील सर्व स्तरांतील लोकांतून होत आहे. गेल्या दिड वर्षात तर कोरोना पार्श्वभूमीवर आशा वर्कर्स यांनी आपला जीव धोक्यात घालून काम केले आहे. आशा वर्कर्स यांचेवर शासनाने जी जबाबदारी सोपवली होती, ती पुर्ण पार पाडण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.

मध्यंतरी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अशी घोषणा केली आहे की, कोरोना काळात शंभर दिवस ज्यांनी काम केले आहे, त्यांना आरोग्य विभागात सामावुन घेतलं जाईल. त्याचधर्तीवर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आशा वर्कर्स यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना शासकीय सेवेत सामावून घेतले जावे, आशा वर्कर्स यांच्या कामाची जबाबदारी मोठी आहे. समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचून जबाबदारी पार पाडणे, वाटते तेवढे सोपे नाही. शासनाचा शेवटच्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहचणारा दुवा म्हणून कार्यरत असलेल्या आशा वर्कर्स यांच्या कामाची जाणीव, महत्व सर्वांना आहेच. शासन कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणारे वैद्यकीय अधिकारी, पोलिस, तलाठी, मंडल अधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना कोरोना योध्दा म्हणून सन्मानित करते. कोरोनाने निधन झाले तर त्यांच्या परिवाराला पन्नास लाख रुपये मदत करते, त्याच धर्तीवर आशा वर्कर्स यांचेही कोरोना पार्श्वभूमीवर महत्वाचे कार्य आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही संकल्पना सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी आशा वर्कर्स या पदर खोचून सक्रिय सहभाग घेतात. वेळेचे बंधन नाही, अपुरे मानधन, इतर कोणत्याही सुविधा नाहीत, अशा कठीण परिस्थितीत त्या स्वतःला झोकून देऊन काम करत असतात. या सर्व गोष्टींचा सहानुभूतीपुर्वक विचार करून शासनाने आशा वर्कर्सना सेवेत सामावून घेतले पाहिजे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here