पर्यावरणाचे संवर्धन केले तरच भविष्यात सजीवसृष्टीचे अस्तीत्व अबाधित – आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड

माढा (बारामती झटका)

विविध हेतूंसाठी मानवाकडून सातत्याने होणारी वृक्षतोड, प्रदुषण, औद्योगिकीकरण, वाढती लोकसंख्या, नागरीकरण, बदलती जीवनशैली आदी कारणांमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. परिणामी जागतिक तापमानवाढ, कोरडा दुष्काळ, दुर्मिळ पशुपक्ष्यांच्या जाती नामशेष होणे, निर्वनीकरण, ओझोनचा थर विरळ होणे, चक्रीवादळ, वाळवंटीकरण असे गंभीर व भयानक परिणाम संपूर्ण मानवजातीला भोगावे लागत आहेत. हे सर्व टाळण्यासाठी प्रत्येकाने पर्यावरणाचा ऱ्हास थांबवून संवर्धन केले तरच भविष्यात मानवजात व सजीवसृष्टीचे अस्तीत्व अबाधित राहू शकेल, असे मत माढा तालुक्यातील विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी व्यक्त केले.

मानवाने बुद्धीमत्ता व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक क्षेत्रात अमुलाग्र प्रगती केली. पण त्याचवेळी तो पर्यावरणाची अपरिमित हानी करीत आहे याकडे माञ, अनेक वेळा दुर्लक्ष झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. मानवाने निसर्गात अतिरिक्त हस्तक्षेप व ढवळाढवळ केली आहे, त्यामुळे आपणच केलेल्या चुकांचे परिणाम भोगावे लागत आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या चरितार्थासाठी व निवाऱ्यासाठी जंगलतोड केली जाते. परिणामी जंगले उध्वस्त होत आहेत. परंतु, याकडे लक्ष दिले जात नाही. शासनाने शतकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत वृक्षारोपण केले परंतु, अनेक ठिकाणी ते फक्त कागदोपत्रीच ठरले. प्रत्यक्षात किती वृक्ष लावले आणि त्यातील किती जगले हे पाहणे महत्त्वाचे आहे. अनेकवेळा मोठा गाजावाजा करीत वृक्षारोपण केले जाते परंतु, काही दिवसांतच खोदलेले खड्डे वृक्षहीन होतात. म्हणजेच त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली जात नाही.

मागील काही वर्षांपूर्वी माध्यमिक स्तरावर पर्यावरण हा विषय अभ्यासक्रमात होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयक माहिती व जागृती आणि प्रबोधन होत होते. परंतु, शासनाने पर्यावरण विषय अभ्यासक्रमातून वगळून त्या ऐवजी माहिती व तंत्रज्ञान विषयाचा अभ्यासक्रमात समाविष्ट केल्याने शासनाची पर्यावरण संवर्धन आणि प्रबोधनाच्या बाबतीत असलेली उदासीनता दिसून आली. पर्यावरण प्रेमी व शिक्षण तज्ञांचे स्पष्ट मत आहे की, विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच पर्यावरणाची संवर्धनाची माहिती देणे गरजेचे आहे. शालेय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कृतीयुक्त पर्यावरण संवर्धनाचे धडे व प्रकल्प पूर्ण करायला लावणे आवश्यक आहे. म्हणजे ते पर्यावरणाची हानी करणार नाहीत व इतरांनाही करू देणार नाहीत. शिक्षण विभागानेही वेळोवेळी पर्यावरण उद्बोधन शिबीरे आणि प्रशिक्षणे दिली पाहिजेत. मागील वर्षी कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन पुकारला त्यामुळे प्रदुषणात घट झाल्याने पाऊस सरासरी पेक्षा जास्त पडला ही बाब निश्चितच आशादायक आहे.

प्रदुषण व वृक्षतोडीला निर्बंध करणारे कायदे आहेत. परंतु दुर्दैवाने त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही, हेच मोठे दुर्दैव आहे. निसर्गाचा समतोल राहण्यासाठी भूभागावर किमान 35 टक्के पेक्षा अधिक भागावर वृक्षसंपदा असणे गरजेचे आहे. परंतु, हे प्रमाण देश पातळीवर आणि महाराष्ट्रात खूपच खाली आले आहे. प्रत्येक सुज्ञ व जागरूक नागरिकांनी संकल्प केला पाहिजे की, मी वृक्षतोड करणार नाही व इतरांना करू देणार नाही. वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणार तसेच इतरांनाही करण्यासाठी भाग पाडणार, स्वतः प्रदुषण करणार नाही व इतरांना करू देणार नाही, पशुपक्ष्यांची शिकार करणार नाही व करू देणार नाही. जलप्रदुषण, ध्वनीप्रदुषण, वायुप्रदुषण, प्लास्टिकचा वापर करणार नाही हे ठामपणे ठरविले तरच भविष्यात सजीवसृष्टी टिकेल अन्यथा एक दिवस असा उजाडेल की मानव जातीचेच अस्तित्व धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here